(लेखकाचे नांव लगेच सापडलेले नाही... कोणी क्लू देईल कां)
चालचलाऊ भगवद्गीता
पार्थ म्हणे गा हृषीकेशी | या युद्घाची ऐशी तैशी
बेहेत्तर आहे मेलों उपाशी | पण लढणार नाहीं !
धोंडयात जावो ही लढाई | आपल्या बाच्यानें होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके.
काखे झोळी, हातीं भोपळा | भीक मागून खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसांत लठ्ठालठ्ठी
या बेटयांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो ! होऊनिया रोग | मराना कां !
लढाई का असते सोपी ? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.
मग बायका बोंबलती घरी | डोई बोडून करिती खापरी
चाल चाल कृष्णा ! माघारीं | सोड पिच्छा युद्घाचा.
अरे, आपण मेल्यावर | घरच्या करतील परद्बार
माजेल सारा वर्णसंकर | आहेस कोठे बाबा !
कृष्ण म्हणें रे अर्जुना ! | हा कोठला बे ! बायलेपणा ?
पहिल्यानें तर टणटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला !
मग आतांच कोठें गेला | जोर तुझा मघांचा ?
तू बेटया | मुळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतों तुला;
परि आतां तुझ्या बापाला | सोडणार नाही बच्चम्जी !
अहाहारे !भागूबाई !| म्हणे मी लढणार नाही;
बांगडया भरा कीं रडूबाई | आणि बसा दळत !
कशास जमfवले आपुले बाप ? नसता बिचार्यांसि दिला ताप;
घरी डारडुर झोंप | घेत पडलें असते !
नव्हते पाहिलें मैदान | तोवर उगाच करी टुणटुण;
म्हणें यँव करीन त्यँव करीन | आतांच जिरली कशानें ?
अरे तू क्षत्रिय की धेड ? | आहे की विकिली कुळाची चाड ?
लेका भीक मागावयाचें वेड | टाळक्यांत शिरलें कोठुनी ?
अर्जुन म्हणे ‘गा’ हरी !| आतां कटकट पुरे करी;
दहादां सांगितले तरी | हेका का तुझा असला ?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरीं घेई !
ढिला म्हण की भागूबाई | दे नांव वाटेल तें.
अैसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनी धनुष्यबाण
खेटरावाणी तोंड करुन | मटकन् खाली बैसला
इति श्रीचालचलाऊ गीतायां प्रथमाsध्याय : |
बुधवार, 14 जनवरी 2009
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
2 टिप्पणियां:
ही गीता बुवा उपाध्यांनी वर्हाडी बोलीत लिहिलेली आहे.
कवी ज.के.उपाध्ये
एक टिप्पणी भेजें